औरंगाबाद- गेली पाच दिवस झाली शासकीय औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातील फार्म डी चे विद्यार्थी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर शिक्षक, क्लिनिकल फार्मासिस्ट पदनिर्मिती, व स्टायपेंड यांसह अनेक मागण्यांसाठी उपोषणाला बसले आहेत. प्रशासन, शासन किंवा अन्य संबंधित अधिकारी साधे त्यांच्याकडे फिरकूनही पाहत नाहीत. यासंबंधी ३ जानेवारी रोजी औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणारे राज्याचे मुख्यमंत्री तरी आपल्याला न्याय देतील या आशेवर असणाऱ्या विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांनी देखील निराशाच केले आहे.
शासकीय औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाचे विद्यार्थी प्रतिनिधी रामप्रसाद नागरे आणि विद्यार्थी गेली पाच दिवस झाले विभागीय आयुक्त कार्यालयसमोर आमरण उपोषणाला बसले आहेत मात्र कुठल्याही शासकीय किंवा प्रशासकीय अधिकारी त्यांना साधे भेटायला सुद्धा आलेले नाहीत. शिक्षक, क्लिनिकल फार्मासिस्ट पदनिर्मिती, व स्टायपेंड यांसह अनेक मागण्या या विद्यार्थ्यांच्या आहेत. यावेळी बोलताना रामप्रसाद नागरे यांनी आपली महाविद्यालयाकडून फसवणूक झाली आहे. विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात असून आम्हाला फार्म डी या अभ्यासक्रमाला प्रवेश घेताना अनेक अश्वासानं दिली गेली होती. मात्र ती अश्वासन खोटी असल्याचे आता समोर येत आहे. शासकीय औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाने फार्मसी कॉन्सिल ऑफ इंडियाला ( PCI ) खोटी माहिती पाठवून अभ्यासक्रम चालू करण्याची परवानगी मिळवली आहे.
अभ्यासक्रम सुरु झाला तेव्हा ना आम्हाला शिकवायला कुठले शिक्षक होते ना कुठली सुविधा तरीही आम्ही शिक्षण पूर्ण केले आहे. सदर कोर्स पूर्ण झाल्यानंतर क्लिनिकल फार्मासिस्ट पद निर्माण करण्याचा कुठलाही अध्यादेश काढला नाही. त्यामुळे मुलांना नोकरी मिळणे शक्य नाही. शासनाने खोटी माहिती सादर करून सुरु केलेल्या या अभ्यासक्रमाविरोधात विद्यार्थ्यांनी सर्व स्तरावर अर्ज विनंत्या व आंदोलन देखील केली आहेत. मात्र प्राचार्य आणि विभागीय तंत्रशिक्षण सहसंचालक औरंगाबाद यांच्याकडून कुठलीही ठोस कार्यवाही शासकीय पातळीवर झालेली नाही. त्यानंतर आम्ही उपोषणाचा मार्ग स्वीकारला, ३ जानेवारी रोजी औरंगाबाद दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्र्यांनी आमचे निवेदन तर स्वीकरले मात्र आमच्याशी कुठलीही चर्चा मुख्यमंत्र्यांनी केली नाही. आमच्या उपोषणाचा तो ३ रा दिवस होता मात्र आम्हाला मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी तीन तास विमानतळावर ताटकळत उभे करण्यात आले. पुढे बोलताना नागरे म्हणाले की जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही. यासाठी मेलो तरी हरकत नाही.